मुंबई (प्रतिनिधी ) - बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यूनाटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांच...
मुंबई (प्रतिनिधी ) - बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यूनाटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेतील पक्षनेते खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांनी आज ही नियुक्ती केली.
नीतीश कुमार यांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या तेव्हा कपिल पाटील त्यांच्या सोबत होते. कपिल पाटील हे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त असून महाराष्ट्रातील समाजवादी विचारांचे एकमेव आमदार आहेत. समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्याला मिळालेला हा मोठा सन्मान आहे.
मुंबईतील शिक्षकांचे ते विधान परिषदेत सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करीत आहेत. शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी त्यांनी विधिमंडळ आणि रस्त्यावर आवाज उठवला. वंचित, पीडितांच्या प्रश्नावर लढणारे नेते म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे.
देशभरातील समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते, संस्था यांच्याशी त्यांचा निकटचा संपर्क आहे. मंडल आयोग चळवळ, ओबीसी चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. छात्र भारती, गांधी - आंबेडकर फाउंडेशन, नवनिर्माण शिक्षण संस्था आणि शिक्षक भारती यांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.
आमदारांना दिलेल्या राजयोग सोसायटीतील घर त्यांनी नाकारले. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातही ते काही काळ होते. धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारांबाबत कधीही तडजोड न करणारे अशी त्यांची प्रतिमा आहे. तरीही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
COMMENTS