कृषी अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन तणावमुक्तीसाठी नेहमी हसतमुख व आनंदी राहा- प्रा. विठ्ठल बुलबुले नगर (प्रतिनिधी) - जन्माला आलो त्...
कृषी अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन
तणावमुक्तीसाठी नेहमी हसतमुख व आनंदी राहा- प्रा. विठ्ठल बुलबुले
नगर (प्रतिनिधी) - जन्माला आलो त्यासोबतच आपल्या वाट्याचा ताणतणावही जन्माला आला. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत तो सुद्धा जिवंत राहणार आहे. त्यामुळे ताणतणावापासून मुक्तीसाठी त्याला मित्र बनवूया. तणावमुक्तीसाठी नेहमी हसतमुख व आनंदी रहावे, हाच त्यावरील रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे मानद व्याख्याते प्रा. विठ्ठल बुलबुले यांनी केले.
कृषी उपविभागाच्या वतीने नगर, पाथर्डी व पारनेर येथील कृषी अधिकारी व कर्मचार्यांच्या तणावमुक्तीसाठी ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत प्रा. बुलबुले बोलत होते. याप्रसंगी नगर उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, नगर तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंंत्र अधिकारी शिल्पा गांगर्डे, सुधीर शिंदे (पाथर्डी), विलास गायकवाड (पारनेर) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रा बुलबुले पुढे म्हणाले की, या भुतलावर जो जो जिवंत आहे, त्या प्रत्येकाला ताणतणाव आहे. माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, न्युनगंड, अहंगंड, खोट्या प्रतिष्ठा, पद, हुद्दा, नातेसंबंध, आरोग्य, व्यसन, भौतिकवस्तू अशा अनेक कारणाने माणसाला ताणतणाव येतो. त्याचा शरीरावर, मनावर व कुटुंबावर परिणाम होत असतो. त्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान, संगीत, छंद, इतरांकडून जास्त अपेक्षा न करणे, अहंकार बाजूला ठेवणे, आनंदी सकारात्मक वृत्तीचे मित्र जमवणे, यातून ताणतणावाचे व्यवस्थापन करता येते व ते शक्य आहे. जो स्वतःला स्वीकारतो, त्याला जग स्वीकारते आणि जो स्वतःला सर्वांगाने स्वीकारतो, त्याला ताणतणावाचे व्यवस्थापन जमते आणि त्याचा प्रवास स्थितप्रज्ञ अवस्थेकडे सुरू होतो, असे सांगितले.
यावेळी प्रा. बुलबुले यांनी अधिकारी व कर्मचार्यांचा उत्साह द्विगुणित करणारे विविध गेम्स घेत यातून हसतखेळत विषय समजावून सांगितला.
श्री. गहिनीनाथ कापसे म्हणाले की, काम करताना कर्मचार्यांवर तणाव असतो. त्यापासून मुक्तीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आज प्रत्येक क्षेत्रात ताणतणाव आहे. परंतु यातूनही प्रत्येकाने आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, तरच त्याला तणावापासून निश्चितच मुक्तता मिळेल. आनंद वाटणार्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत. कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान परमेश्वराकडून लाभलेलं आहे. त्यामुळेच प्रत्येकाने नेहमी आनंदी राहून तणावमुक्त जीवन जगत जीवनाचा खरा आनंद घ्यावा, असे ते म्हणाले.
कृषी उपविभागाच्या वतीने नगर, पाथर्डी व पारनेर येथील कृषी अधिकारी व कर्मचार्यांना तणावमुक्तीसाठी ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे मानद व्याख्याते प्रा. विठ्ठल बुलबुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागी कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी शिल्पा गांगर्डे सुधीर शिंदे, विलास गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (छाया/समीर मन्यार)
COMMENTS