पुणे ग्रामीण पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना राष्ट्रपतींचे 'पोलीस शौर्य पदक' तर पोलीस दलातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना "केंद...
पुणे ग्रामीण पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना राष्ट्रपतींचे 'पोलीस शौर्य पदक' तर पोलीस दलातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना "केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर
शिरूर (प्रतिनिधी ) - पुणे ग्रामीणचे (हवेली विभाग) पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना यंदाचे राष्ट्रपती पोलीसशौर्य पदक जाहीर झाले आहे.
ढोले हे नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे रहिवाशी असून त्यांनी गडचिरोली येथे किस्नेली चकमकीमध्ये नक्षलवाद्याशी जोरदार लढत देत पाच नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कल्पकता,नियोजन यामुळे गडचिरोली येथे अनेक नक्षलवाद्यांना शरण आणण्यास भाग पाडले.त्यामुळे नक्षली चळवळ थंडावली. त्यांच्या या शौर्यबद्दल त्यांना या वर्षीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यापूर्वी देखील गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी साठी त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांचे भाऊसाहेब हे चिरंजीव आहेत.पत्रकार विश्वातून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून भाऊसाहेब ढोले यांचे अभिनंदन होत आहे.
गृह विभाग, भारत सरकारकडून उत्कृष्ट तपसाकरीता देण्यात येणारा "केंद्रीय गृहमंत्री पदक सन २०२२ चा पुरस्कार पुणे ग्रामीण पोलीस दलातील ०३ पोलिस अधिकाऱ्यांना जाहिर झाला.
क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास उत्कृष्टरित्या करणाऱ्या तपासी अधिकारी यांना गृह विभाग भारत सरकारकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक " दरवर्षी प्रदान केला जातो.याकरीता महाराष्ट्र पोलीस दलास दरवर्षी एकुण ११ पदके प्रदान केली जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणाच्या एकुण ०४ तपासी अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला होता त्यापैकी ०३ तपासी अधिकारी यांना उत्कृष्ट तपासा करीता गृह विभाग भारत सरकारकडुन "केंद्रीय गृहमंत्री पदक" सन २०२२ करीता आज १२/०८/२०२२ रोजी जाहिर झाले आहे.
पुरस्कार यामध्ये पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार हे लोणावळा शहर येथे प्रभारी अधिकारी असतांना लोणावळा शहर पो.स्टे. गु.र.नं. ६०/२०२१, भा.द.वि. कलम ३९५, १२० (ब) अन्वये दाखल होता. सदरच्या गुन्हयात आरोपींनी डॉ. खंडेलवाल रा. लोणावळा यांच्या घरात दारोडा टाकला होता. या गुन्हयात मध्यप्रदेश मधील आंतरराज्यीय टोळी निष्पन्न झाल्यावर आरोपीनां मध्यप्रदेशमधुन अटक करण्यात आली होती. या गुन्हयाच्या अनुषंगाने तपासा दरम्यान वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पवार व त्यांचे पथकाने गुन्हा घडल्या तारखेपासुन अहोरात्र अथक परीश्रम करून १० दिवसाच्या आत गुन्हयाची उकल केली. पवार व त्यांचे पथकाने तपासा दरम्यान एकुण १५ आरोपींना अटक करून गुन्हयात गेलेला एकुण ३०,५२,२०० /- रूपये किंमतीचा रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरूर येथे प्रभारी अधिकारी असतांना शिरूर पो.स्टे. गु.र.नं. ८१६ / २०२१, भा.द.वि. कलम ३९५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) गुन्हा दाखल होता. या गुन्हयामध्ये आरोपींनी बॅक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड ता. शिरूर या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व हजर ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवुन एकुण ८२४ तोळे साने चांदीचे दागिने व रोख रक्कम ३२,५२,५६०/- रूपये असा ऐवज लुटुन नेला होता. हा गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने पुणे ग्रामीण पोलीस दलासमोर आव्हान होते.. सदर गुन्हयाचा शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा यांनी समांतर तपास करून या गुन्हयामध्ये एकुण २,३६,४२,९६०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ०५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गुन्हयाच्या तपासा दरम्यान त्यांनी व त्यांचे सोबतच्या पथकाने अहोरात्र अथक परिश्रम करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा येथे प्रभारी अधिकारी असतांना कातकरी समाजाची एक लहान मुलगी हरविलेबाबत तक्रारीवरून वेल्हा पो.स्टे. गु.र.नं. ०६/२०२१, भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सदरची मुलगी मयत स्थितीत मिळुन आली होती. या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिचेवर लैंगिक अत्याचार होवुन ती मयत झालेबाबत अभिप्राय दिला होता. त्यावरून सदर गुन्हयास पाक्सो कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्यात आले होते. सदरचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पवार व त्यांचे पथकाने अथक परीश्रम करून सी.सी. टी.व्ही फुटेज व साक्षीदार यांचेकडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपीस ४८ तासात जेरबंद केले होते. सदरचा खटला मा.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांच्या विनंती नुसार जलदगती न्यायालयात चालविला गेला व सदर गुन्हयात आरोपीस मा. न्यायालयाने दिनांक २८/०२/२०२२ रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनाविली आहे.
अशा या क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास करतांना मा. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण तसेच मा. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक पुणे, मा. मिलिंद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग व उपविगीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गृह विभाग भारत सरकारकडुन उत्कृष्ट तपासाकरीता “केंद्रीय गृहमंत्री पदक" सन २०२२ करीता जाहीर झालेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
COMMENTS