शिरुरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे,(प्रतिनिधी ) - शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अख...
शिरुरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे,(प्रतिनिधी ) - शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकूण २५ कोटी रुपयांची तरतूद करणार असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार, प्रसिद्ध उद्योगपती तथा सभागृह नेते प्रकाश भाऊ धारिवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले,नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराचा विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवून शिरुर नगरीचा विकास करावा.
नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेवूनच प्रशासनाला सहकार्य करायला हवे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरीकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल. पुणे ते शिरुर रस्त्याचे दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारीमार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिरुर परिसर हे मराठवाड्याच्या नागरिकांकरीता पुणे व मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून भविष्यात ओळखले जाईल अशी विकासकामे करण्याचा प्रयत्न आहे.
सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले की, 2016 साली अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आणि त्यांच्याच शुभहस्ते आज इमारतीचे उद्घाटन करण्यात आले हा दुग्धशर्करा योग आज जुळून आला. आगामी काळात शिरूर च्या कामाचे उद्घाटनासाठी आपण मुख्यमंत्री म्हणून याल हे प्रभू रामलिंग चरणी प्रार्थना करतो. शिरूर लोकसभेचे तरुण तडफदार खासदार अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना प्रभू रामलिंग यांचा आशीर्वाद लाभल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार श्री.पवार म्हणाले, शिरुर परिसरातील पायाभूत विकास करण्यासाठी वेळोवेळी निधी प्राप्त झालेला आहे. यापुढेही विविध विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते नगर परिषद आवारात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते फित कापून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली.
शिरूर शहरातील हुडको कॉलनी येथील युवा उद्योजक आदित्य चोपडा वय वर्षे 24 याची निर्घुन हत्या करण्यात आली. आरोपीला तातडीने पकडून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन शिरूर शहर व पंचक्रोशी शिरूर, आदित्य चोपडा मित्रपरिवार शिरूर, सकल ओसवाल जैन समाज शिरूर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आदित्य चोपडा हत्याप्रकरनाची तातडीने दखल घेऊन आरोपींना तातडीने पकडण्यासाठी नगरचे पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.
अजित पवार पुढे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था ही राखली पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच लगाम घालून पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. पोलीस ठाण्याच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा अवैद्य धंदे खपवून घेणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे चुकीचे कामे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलिस प्रशासनाला त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमास माजी आ.पोपटराव गावडे, मा. आ.रमेश थोरात, उपनगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, मुख्याधिकारी अँड प्रसाद बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिरूर तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे, युवक शहर कार्याध्यक्ष अमित शिर्के, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ऍड सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,प्रभाकर डेरे मामा,माजी पशुसंवर्धन समिती सभापती सुजाता भाभी पवार, जि प सदस्य राजेंद्र जगदाळे, सरपंच विलास कर्डिले, उपसरपंच कृष्णा घावटे, सरपंच नामदेव जाधव, शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात, आदर्श सरपंच अरुण घावटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड वसंतराव कोरेकर, माजी सभापती शशिकांत दसगुडे,उप सभापती प्रवीण चोरडिया,चर्मकार महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे,जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी केले. स्वागत नगराध्यक्ष वैशालीताई वाखारे, सूत्रसंचालन नगरसेवक विजय दुगड यांनी केले तर आभार संतोष भंडारी यांनी मानले.
COMMENTS