अमरावती(प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी....
अमरावती(प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. आपदग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू आदी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या कुटुंबांना भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना तत्काळ मदत, सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार नीता लबडे, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.
खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात प्रवीण गुडधे, निरंजन गुडधे हे युवक वाहून गेले. या दोहोंच्या कुटुंबियांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली व सांत्वन केले. घरातील व्यक्ती जाण्याचे दु:ख मोठे आहे. आपण स्वत: एक कुटुंबिय म्हणून या कुटुंबांच्या कायम पाठीशी राहू. या कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी दिलासा दिला. यावेळी पालकमंत्र्यांकडूनही 10 हजार रूपयांची तातडीची मदत करण्यात आली.
COMMENTS