मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड तालुक्यातील धसई परिसरातील रामपूर येथील सुस्थितीत असणाऱ्या विहिरींची ग्रामपंचायतीने तोडफोड केल्याने ऐन पावसाळ्...
मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड तालुक्यातील धसई परिसरातील रामपूर येथील सुस्थितीत असणाऱ्या विहिरींची ग्रामपंचायतीने तोडफोड केल्याने ऐन पावसाळ्यात आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे आदिवासींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी पाणीपुरवठा अधिकारी व ग्रामसेवक यांना निलंबित करून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती .मागणी करूनही चालढकल करणाऱ्या पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात रामपूर, मेंगाळवाडी,सोंगाळवाडी येथील संतप्त आदिवासी महिलांनी मुरबाड पंचायत समितीवर हल्लाबोल करीत धरणे आंदोलन केले.
धसई परिसरातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या रामपूर येथील आदिवासींची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने सरकारने २००० मध्ये त्या ठिकाणी विहीर खोदून पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली होती. येथील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असताना व विहीरही सुस्थितीत असताना ग्रामपंचायतीने आदिवासींसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न करता ती विहीर तोडून टाकली आहे
त्या विहिरीच्या नवीन बांधकामासाठी ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरी घेतलेली नाही. याचा जाब आदिवासींनी सरपंचाना विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यावेळी संतप्त आदिवासींनी काम रोखून गटविकास अधिकारी यांना घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची विनंती केली असता मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार व विस्तार अधिकारी आनंद मुरेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. व आदिवासींना पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याचे उघड झाल्याने पर्यायी पिण्याच्या पाण्याची टँकर द्वारे व्यवस्था करण्याची ग्वाही दिली.
आदिवासींकरिता पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे वातावरण शांत झाले. मात्र १५ दिवस उलटून गेले तरी प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने ऐन अतिवृष्टीत त्यांना डबक्याच्या गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याने .अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आज संघटनेचे अध्यक्ष नारायण जैतु सावळा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व पाणीपुरवठा अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करीत मुरबाड पंचायत समितीवर धरणे आंदोलन केले.या प्रसंगी संतप्त आदीवासी महिलांनी ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करीत संबंधिता वर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली
या धरणे आंदोलनाची दखल मुरबाड पंचायत समितीचे सभापती दीपक पवार, गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी घेऊन प्रदर्शनकारी आदिवासी महिलांना संबंधित अधिकारी व इतरांवर दोषी आढळल्यास कारवाई करू त्याच प्रमाणे येत्या गुरुवारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा अधिकारी ,ठेकेदार व आदिवासी शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे अभिवचन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुरबाड तालुका अध्यक्ष नारायण सावळा, सचिव कमळू खाकर,काशीनाथ वाघ, नारायण वाघ, सामाजीक कार्यकर्ता छगन दरवडा, रमेश हिंदुराव, धनाजी वाघ, यशवंत वाघ, प्रकाश पारधी, कुशीबाई वाघ, मंदा वाघ,विठ्ठल वाघ आदी कार्यकर्ते व आदिवासी महिलां व पुरुषांनी धरणे आंदोलन केले.
COMMENTS