Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान...

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान २०२१-२२ चा शुभारंभ

वन विभागाच्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन


मुंबई,( प्रतिनिधी )
- पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून विकास कामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 

आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षात ‘माझी वुसंधरा’ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, अमृत शहरांचा तसेच अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या २०२१-२२ या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते

 

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे यांच्यासह अभियानात सहभागी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि गाव आणि शहर पातळीवर अभियानात सहभागी होऊन काम करणारे कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या कांदळवन कक्षाने तयार केलेल्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

 

आपल्या आयुष्यातील पर्यावरणाचे महत्त्व वेगळ्याने सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बीएचके टु बीएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. पण विकासाचा हा  असा हव्यास आपल्या जीवनाला घातक ठरत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपण पंचमहाभूतांपासून दूर जात असल्याचे सांगताना त्यांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर हुकमत गाजवत असल्याचेही म्हटले. कोरोनाकाळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व पटले, आपण ऑक्सिजन निर्मिती करत आहोत, पण निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट आपण उद्ध्वस्त करत चाललो आहोत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

 

आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती, त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा, नागपंचमीला नागांची पूजा  केली जाते. आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे रक्षण केले परंतु आता आपल्या घरासमोर साधे तुळशीवृदांवन बांधण्याला जागा नाही, इतक्या इमारती उभ्या राहात आहेत. कांदळवनात भव्य अशी जीवसृष्टी दडलेली आहे,  वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे  महत्त्व आणि त्याचे  रुप आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले. माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या सर्व पुरस्कार्थींचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. तसेच अभियानात सहभागी होऊन उत्तम काम करणाऱ्या आणि सहभाग नोंदवणाऱ्या गाव – शहरातील संस्थांचा, कार्यकर्त्यांचा आणि सर्व सहभागीदारांचा त्यांनी गौरव केला.

पर्यावरण रक्षणाच्या कामात सातत्य हवे – उपमुख्यमंत्री

 पर्यावरण रक्षणाचे काम हे काही एक दिवसाचे किंवा काही दिवसांचे नाही, ते नियमित स्वरूपाचे आहे. त्यामुळे पुरस्कार मिळवलेल्या आणि माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालेल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कामात सातत्य ठेवावे, आपल्या कामातून इतरांना प्रेरणा देऊन त्यांनाही माणसाला जगवणाऱ्या या कामात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

पर्यावरण रक्षणाचे काम हे वैयक्तिक आणि सामजिकस्तरावर प्रत्येकाकडून होण्याची गरज व्यक्त करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या चांगल्या जगण्यासाठी आवश्यक असलेले शुद्ध पाणी, शुद्ध हवा आणि सकस आणि शुद्ध अन्नधान्य मिळवायचे असेल तर हवा, पाणी प्रदुषणाला कारणीभूत घटकांवर नियंत्रण मिळवायला हवे. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करतांना जलस्त्रोतांचे शुद्धीकरण आणि त्यांचे प्रदुषणापासून रक्षण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी जंगले वाचवण्याची, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून ती जगवण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व पटले असून पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करतांना सौरऊर्जा उपकरणांचा वापर वाढवणे, प्रदूषणरहीत वाहने वापरणे काळाची गरज झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी झाडे लावून ती जगवली तर विद्यार्थ्यांना वेगळे गुण देण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाने करावा, अशी सुचनाही याप्रसंगी केली.

पर्यावरण रक्षण हे जगातील सर्वोत्तम काम – बाळासाहेब थोरात

 पर्यावरण रक्षण हे जगातील सर्वोत्तम काम असल्याचे सांगून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, माझी वसुंधरा अभियानात गाव-शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला, त्यांच्याकडून उत्तम काम करून घेण्याची जबाबदारी पर्यावरण विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली. या कामाला आणखी पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगतांना मनापासून काम केले तर यश मिळतेच, या कामाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, आपली वसुंधरा हरित, स्वच्छ आणि सुंदर करा, असे आवाहन केले. हे काम आपल्या चांगल्या जगण्यासाठी आवश्यक आहेच, परंतु पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

 

ग्रामविकास विभाग यावर्षीच्या अभियानात जोमाने सहभागी होणार- हसन मुश्रीफ

 पर्यावरण विभागाने आज जाहीर केलेल्या २०२१-२२ या वर्षासाठीच्या “माझी वसुंधरा अभियानात” ग्रामविकास विभाग जोमाने सहभागी होऊन गावपातळीवर पर्यावरण रक्षणाचे काम करील अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, पंधराव्या वित्त आयोगात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी, सौर ऊर्जा उपकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्याचा वापर गावाचे पर्यावरण रक्षण करण्यासाठी केला जाईल. त्यांनी वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम थांबवायचे असतील तर केवळ एका माणसाने, एका राज्याने किंवा एका देशाने नाही तर जगाने या कामात मनापासून उतरले पाहिजे असे म्हटले. त्यांनी आरेच्या जंगलाचे रक्षण केल्याबद्दल पर्यावरण विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचेही यावेळी सांगितले.

 कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून अभियानाची अंमलबजावणी – आदित्य ठाकरे

 आपल्या प्रास्ताविकामध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यात २०२०-२१ या वर्षात राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानाच्या यशाची माहिती दिली. ते म्हणाले की पर्यावरण रक्षण करण्याचे, कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचे उद्दिष्ट ठेऊन हे अभियान राबविण्यात आले. त्यांनी अभियानात २१.९४ लाख झाडे लावून भूमीचे रक्षण करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली. त्यांनी अभियानात जुन्या आणि नवीन हरित क्षेत्रांची झालेली निर्मिती, ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून वर्षभरात तयार करण्यात आलेले कंपोस्ट खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर पर्कोलेशन झालेल्या इमारतींची संख्या आणि त्याद्वारे संवर्धित झालेली पाणीक्षमता, जलसंस्था, स्वच्छतेची कामे, बायोगॅस प्लांटची निर्मिती अशा विविध कामांची माहिती यावेळी दिली. आपली संस्कृती ही पृथ्वीची जपणुक करण्याचा संस्कार देणारी आहे. त्यामुळे चांगले जगायचे असेल तर पृथ्वीचे रक्षण आणि संवर्धनाच्या कामात प्रत्येकाने सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण वातावरण बदलांकडे जेवढे दुर्लक्ष करू तेवढे आपले नुकसान होईल असे सांगतांना त्यांनी गेल्यावर्षी अशाच नैसर्गिक आपत्तीकाळात राज्याने जवळपास १३ हजार ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिल्याची माहितीही दिली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी अभियानाची रुपरेषा सांगितली. कोरोनाचे संकट असतानाही अभियानात सहभागी झालेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम कामगिरी केली आहे. पर्यावरण संवर्धनाचे फायदे या ठिकाणी आता दिसून येत आहेत. आता माझी वसुंधरा अभियान – २ ही राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात निवृत्त संचालक (माहिती) प्रल्हाद जाधव लिखित माझी वसुंधरा अभियान गीताचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

ठाणे मनपा, हिंगोली नगरपरिषद, शिर्डी नगरपंचायत आणि पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार

 

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने माझी वसुंधरा अभियान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अमृत शहरे गटामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ हा पुणे महापालिकेने तर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ हा नाशिक महापालिका आणि बार्शी नगरपरिषद (जि. सोलापूर) यांना विभागून प्रदान करण्यात आला.

 

नगरपरिषद गटामध्ये हिंगोली (जि. हिंगोली), कराड (जि. सातारा) आणि जामनेर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. परळी (जिल्हा बीड) नगरपरिषदेला उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ आणि वैजापूर (जिल्हा औरंगाबाद) आणि संगमनेर (जि. अहमदनगर) यांना विभागून उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ प्रदान करण्यात आला.

 

नगरपंचायत गटामध्ये शिर्डी (जि. अहमदनगर), कर्जत (जि. अहमदनगर) आणि मलकापूर (जि. सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर निफाड (जि. नाशिक) आणि मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २ चा पुरस्कार पटकावला.

 

ग्रामपंचायतींमध्ये पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक), मिरजगाव (जि. अहमदनगर) आणि चिनावल (जि. जळगाव) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. पहुर पेठ (जि. जळगाव) आणि लोणी बुद्रुक (जि. अहमदनगर) यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

उत्कृष्ट कामगिरीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना विभागून प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव जि.प. चे डॉ. बी. एन. पाटील, अहमदनगर जि.प.चे राजेंद्र क्षीरसागर आणि नाशिक जि.प.च्या लीना बनसोड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

माझी वसुंधरा अभियानाविषयी….

 

माझी वसुंधरा अभियान पहिल्या वर्षी अमृत शहरे, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत या चार आस्थापनांसाठी एकूण ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत राबवले गेले. केवळ काही महिन्यातच माझी वसुंधरा ई-प्लेज (ई-प्रतिज्ञा) या उपक्रमात १.३० कोटीपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्याद्वारा जवळपास १८ हजार जनजागृती कार्यक्रम राज्यभर घेण्यात आले व त्याद्वारे पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळजीपूर्वक वापर, शाश्वत विकास व वातावरण बदलाचे घातक परिणाम याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

 

अल्पावधीतच माझी वसुंधरा अभियानातून झालेले सकारात्मक बदल :

 

— या अभियानांतर्गत २१.९४ लाख झाडे लावण्यात आली. आरेतील जंगलाच्या ४ पट झाडे या उपक्रमाद्वारे राज्यभरात लावण्यात आली.

 

— १६५० हरित क्षेत्रांची निर्मिती शहरात व गावांमध्ये करण्यात आली तसेच २३७ जुनी हरित क्षेत्रे पुनर्जीवित करण्यात आली.

 

— माझी वसुंधरा अभियानांतर्गत शास्त्रीय पद्धतीने ओल्या कचऱ्याचे विलगीकरण, वर्गीकरण व त्यावर उपचार करण्यात आले व त्यामुळे १०,६६३ टन कंपोस्ट खत दर महिन्याला तयार करण्यात आले ज्याद्वारे ६३,९८२.५ टन कार्बन डायऑक्साईडचे सेक्वेस्टरेशन करण्यात आले.

 

— माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांना रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पर्कोलेशन या प्रक्रियांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले गेले. त्याचा परिणाम म्हणून जवळपास ६ हजार जुन्या इमारती व ३.५ हजार नवीन इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा अवलंब केला, त्याचबरोबर सुमारे पंधराशे रेन वॉटर पर्कोलेशन स्थाने तयार करण्यात आली.  या प्रयत्नांमुळे ११,१४५ दशलक्ष लिटर पाणी संवर्धन क्षमता तयार करण्यात आली आहे, जी महाराष्ट्राला लागणाऱ्या १ दिवसाच्या पाण्याच्या मागणी इतकी आहे.

 

— सहभागी संस्थांनी राज्यातील ७७५ जलसंस्था स्वच्छ करण्याचे काम पार पाडले.

 

— अभियानादरम्यान १२.२३ लाख एलईडी बल्ब तसेच ७० हजार सोलर लाईट्स लावण्यात आले, ज्यामधून १.४ लाख युनीट वीज वाचवण्यास मदत झाली आहे.

 

— ग्रामीण भागात अभियानादरम्यान ७३६ बायोगॅस प्लांट व ७०१ सोलर पंप बसवण्यात आले, ज्यामुळे जवळपास ३२.५ टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले.

 

— माझी वसुंधरा अभियानामुळे पहिल्याच वर्षात ३,७०,९७८ टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले, जे तुलना केल्यास हे  प्रमाण १.७ कोटी मोठी झालेली झाडे जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील तितके आहे किंवा ३४ आरे जंगले जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील तेवढे आहे.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,89,Crime,47,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,131,Maharastra,4,Politics,41,Religion,161,Sports,8,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
https://1.bp.blogspot.com/-lIB9-U05DUI/YLxQxD7s8UI/AAAAAAAAFIg/Tg9f5Y5hAM8N4LzNei06Q8Vm1QVVpCV5ACLcBGAsYHQ/w400-h303/6-21-3.jpg
https://1.bp.blogspot.com/-lIB9-U05DUI/YLxQxD7s8UI/AAAAAAAAFIg/Tg9f5Y5hAM8N4LzNei06Q8Vm1QVVpCV5ACLcBGAsYHQ/s72-w400-c-h303/6-21-3.jpg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/06/CM%20Uddhav%20Thakare.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/06/CM%20Uddhav%20Thakare.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content