शहरातील प्रमुख रुग्णालयांची पालकमंत्र्यांकडून पाहणी; रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी नागपूर- कोविड रुग्णांची वा...
शहरातील प्रमुख रुग्णालयांची पालकमंत्र्यांकडून पाहणी; रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी
नागपूर- कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. अशावेळी अतिदक्षता कक्षाबाहेरील रुग्णांसाठी डोझी उपकरण उपयुक्त ठरत आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार डोझी उपकरणाच्या पूर्वचेतावणी प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डोझी उपकरण कंट्रोल रुमचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डोझी उपकरणाचे मुख्य संस्थापक मुदीत दंडवते, बधीरिकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. वैशाली शेलगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या 150, मेडिकलमध्ये 100 तर किंग्जवे रुग्णालयात 25 डोझी उपकरण आहे. या उपकरणाद्वारे डॉक्टर दूरस्थपध्दतीने रुग्णांचे निरीक्षण करुन त्यांच्यावर उपचार करु शकतात. कोरोना संसर्गाच्या काळात हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे. गंभीर टप्यावर असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना यामुळे मदत होत आहे. यासाठी डोझी उपकरणाचा आवश्यकतेनुसार वापर करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डोझी उपकरण लावण्यात आलेले असून याद्वारे रुग्णाच्या हृदयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, स्लीप एपनिया निर्देशांक, रुग्णाचा अस्वस्थता निर्देशांक तसेच हृदयासंबंधी सर्व माहिती मिळते. हे उपकरण रुग्णाच्या गादीखाली लावण्यात येते. यामुळे रुग्णाची अस्वस्थता, रुग्णाची प्रकृती जोखमीची किंवा अतिजोखमीची आहे का, याबाबत डॉक्टरांना माहिती मिळते. या उपकरणाला वैद्यकीय भाषेत ‘स्टेपडाऊन आयसीयु’ म्हणतात. येथे सप्टेंबर 2020 पासून डोझी उपकरण लावण्यात आले आहे. येथे आतापर्यंत डोझी उपकरणाद्वारे 2009 रुग्णांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. यातील 73 रुग्ण हायरिक्समध्ये गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांना तात्काळ अतिदक्षता कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे 48 रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मदत झाली आहे. तसेच 162 रुग्णांची प्रकृतीतील बदल बघता त्यांच्यावर वेळीच ऑक्सिजन, व्हेंटीलेटर पुरवून उपचार करण्यात आले आहे. अतिदक्षता कक्षामधून बरे झालेले रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठीही डोझी मशीन उपयुक्त ठरते, अशी माहिती डॉ. वैशाली शेलगावकर यांनी यावेळी दिली.
सध्या कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे ऑक्सिजनचा वापर करताना तो जपून करावा. रुग्ण जेवत असताना, स्वच्छतागृहात गेल्यानंतर तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी 95 च्यावर अशावेळी ऑक्सिजनचा वापर टाळावा. परिचारिका, वार्डबॉय यांना याबाबत अवगत करावे. नर्सिंग स्टेशनमधून ऑक्सिजनचा योग्य वापर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्र्यांनी शहरातील विविध रुग्णालयांना भेट देवून तेथे कोविड सेंटर उभारण्याबाबत पाहणी केली. त्यांनी सोमवारपेठ येथील महाराष्ट्र राज्य कामगार रुग्णालयाला भेट दिली. येथे कोविड सेंटर उभारणीबाबत त्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागपूरमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून रुग्णांवर वेळीच तातडीने उपचार व्हावे यासाठी शक्य असेल त्या रुग्णालयात कोविड सेंटर तयार करा. जेणेकरुन कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीना देशमुख यांनी यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका तसेच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती दिली.
डॉ. राऊत यांनी हज हाऊस इमारतीला भेट देवून तेथे कोविड सेंटर उभारण्याबाबत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला भेट देवून तेथील वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून पूरक काम करणाऱ्या यंत्रणेने गेल्या काही दिवसात केलेल्या कामांचे कौतुक केले.
COMMENTS